Saturday, October 24, 2020

Yamfly

Butterflies of Sindhudurg

Yamfly

Loxura atymnus (Lycaenidae)

सह्याद्री यामफ्लाय

सह्याद्री यामफ्लाय

Scientific Name : Loxura atymnus (Stoll, 1780)
Subspecies : L. atymnus atymnus (Stoll, 1780)
Common Name : Yamfly, Sahyadri Yamfly
Marathi Name : यामिनी
Wingspan : 3.5-4 cm
Host plant : घोटवेल (Smilax)


ओळख :-

"यामफ्लाय" हेे भारत-मलेशिया पट्ट्यात आढळणारे सुंदर फुलपाखरू. याचे शास्त्रीय नाव 'लाॅक्झुरा अॅटिम्नस' असून लायसिनिडी (निल) कुळात समावेश होतो. याच्या पश्चिम घाटात आढळणार्‍या उपजातीला "सह्याद्री यामफ्लाय" असे संबोधले जाते. करांदा किंवा याम याच्या खाद्य वनस्पती असल्यामुळे याचे नाव "यामफ्लाय" व "यामिनी" ठेवण्यात आले आहे.

आढळ व व्यवहार :-

लांब शेपटी व केसरी रंगसंगतीमुळे उडताना खुप सुंदर दिसते. फुलांवर वावर जवळपास नाहीच. बर्‍याच वेळा घोटवेल, दिंडा सारख्या वनस्पतींच्या खोडातून स्त्रवणारा रस पिताना दिसून येतात. पंख उघडून सूर्यप्रकाशात ऊन शेकताना दिसतात. याच्या खाद्य वनस्पती करांदा व घोटवेल पावसाळ्यात वाढत असल्यामुळे, पावसाळ्यात या फुलपाखरांची संख्या खूप जास्त असते.
सह्याद्री यामफ्लाय (दिंड्यावर रस पिताना)

सह्याद्री यामफ्लाय (ऊन शेकताना)

वर्णन :-

पंखविस्तार 3.5 ते 4 सेमी असू शकतो. बंद पंखांचा रंग पिवळसर-केसरी व त्यावर फुसट तपकिरी ठिपक्यांच्या रांगा असतात. मागच्या पंखांचे टोक निमुळते होत जाऊन शेपटीसारखे दिसते. उघड्या पंखांचा रंग भगवा असून वरच्या कडा तपकिरी असतात. नर व मादी सारखेच दिसतात.

खाद्य वनस्पती :-

घोटवेल - Smilax
 Smilax zeylanica (Smilacaceae)
घोटवेल ही पावसाळ्यात वाढणारी काटेरी वेल. खोड व नवीन पालवी लालसर असून त्यावर खुप काटे असतात. याच्या कोवळ्या कुवर्‍यांंची भाजी केली जाते.

जीवनक्रम :-

अंडी पांढरी असूून खाद्य वेलींच्या कुवर्‍यांवर घातली जातात.
सुरवंट लालसर-हिरव्या रंगाचा असल्याने खाद्य वनस्पतीच्या खोडासारखाच दिसतो. सुरवंट मुंग्यांसोबत सहजीवन जगतो. सुरवंटाकडून मुंग्यांना मधासारखा गोड द्रव दिला जातो बदल्यात मुंग्यांच्या अस्तित्वामुळे सुरवंटाला इतर शिकार्‍यांंचा धोका नसतो. सुरवंट 12-13 दिवसांत 1.5 सेमी पर्यंत वाढतो.
सह्याद्री यामफ्लाय (सुरवंट)

पूर्ण वाढ झाली की सुरवंट कोष तयार करतो. कोष हिरवा असून मागच्या टोकाने आधाराला चिकटलेला व आधारासलगच असतो.
साधारण 7-8 दिवसांनंतर कोषातून फुलपाखरू बाहेर येते.


निल - Blues
Lycaenidae > Theclinae > Loxurini 

Tuesday, October 20, 2020

Crimson Rose

 Butterflies of Sindhudurg

Crimson Rose

Pachliopta hector (Papilionidae) 

क्रिमसन रोझ
Family : Papilionidae (Swallowtails)
Scientific Name : Pachliopta hector (Linnaeus, 1758)
Common Name : Crimson Rose
Marathi Name : किरमिजी मदालसा
Wingspan : 8-11 cm
Host plant : सापसण (Indian Birthwort)
Protection : WPA-I (India)

ओळख :-

"क्रिमसन रोझ" हे दक्षिण भारतात आढळणारे दुर्मिळ फुलपाखरू. याचे शास्त्रीय नाव 'पॅक्लिओप्टा हेक्टर' आणि याचा समावेश पॅपिलिऑनिडी (पूच्छ) कुळात होतो. आकर्षक रंग व विषारी शरीर यांमुळे याचे नामकरण "किरमिजी मदालसा" व "क्रिमसन रोझ" करण्यात आले आहे. हे फुलपाखरू भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची एक अंतर्गत संरक्षित आहे.

क्रिमसन रोझ

आढळ व व्यवहार :-

खूप उंच व जलद गतीने उडतात. मधुरसासाठी फुलांवर येतात. फार कमी वेळा, उंच झाडावर पंख पसरून ऊन शेकताना किंवा आराम करताना दिसतात. ही फुलपाखरे स्थलांतर करतात.

वर्णन :-

पंंखविस्तार 8-11 सेमी असतो. पंखांच्या दोन्ही बाजूंचा रंग काळा असून, पुढच्या पंखांवर तिरक्या पांढर्‍या रेषा तर मागच्या पंखांवर किरमिजी-लाल ठिपके असतात. पूच्छ कुळातील इतर फुलपाखरांप्रमाणे, मागच्या पंखांचे टोक वाढून शेपटीसारखे दिसते. नर-मादी सारखेच दिसतात. काही वेळा मादीतील लाल ठिपके फिकट असतात. शरीराचा रंग भडक लाल-काळा असतो. भडक रंगाचे शरीर हा शिकार्‍यांसाठी विषारी व धोक्याचा संकेत असतो. विषारी शरीरामुळे, काॅमन माॅरमाॅन मादीचे 'रोमुलस' रुप, संरक्षणासाठी याची नक्कल करते. शरीराचा आकार व रंग हा दोघांमधील मुख्य फरक. रोझचे शरीर लाल व आकार मोठा तर माॅरमाॅनचे शरीर काळे व आकार लहान असतो. तसेच काॅमन माॅरमाॅन मधील मागच्या पंखांवरील लाल ठिपके फिकट असतात.

क्रिमसन रोझ & काॅमन माॅरमाॅन 'रोमुलस' मादी
(दोघांमधील तुलनात्मक फरक)

खाद्य वनस्पती :-

सापसण (सापशीन) - Indian Birthwort
 Aristolochia indica (Aristolochiaceae)
सापसण ही स्थानिक औषधी वेल असून जंगलात आढळते. या वनस्पतीत ॲरिस्टोलाॅकिक ॲसिड हा विषारी घटक असतो. यावर वाढणारे रोझ व बर्डविंग सुरवंट, हे विषारी घटक पचवतात व स्वतःचे शरीर विषारी बनवतात. त्यामुळे त्यांची शिकार होत नाही.


पूच्छ - Swallowtails
Papilionidae > Papilioninae > Troidini

Monday, October 19, 2020

Peacock Royal

Butterflies of Sindhudurg

Peacock Royal

Tajuria cippus (Lycaenidae)

पिकाॅक राॅयल (मादी)
Family : Lycaenidae (Blues)
Scientific Name : Tajuria cippus (Fabricius, 1798)
Subspecies : T. cippus cippus (Fabricius, 1798)
Common Name : Peacock Royal
Marathi Name : मयुरेश
Wingspan : 3-4.5 cm
Host plant : बांडगूळ (Honey Suckle Mistletoe)
Protection : WPA-II (India)

ओळख :-

"पिकाॅक राॅयल" हे भारत-मलेशिया पट्ट्यात आढळणारे राजस निल फुलपाखरू. याच्या वरच्या पंखांवर असणाऱ्या मोरपंखी रंगदिप्तींमुळे याचे नामकरण "पिकाॅक राॅयल" व "मयुरेश" करण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव 'ताजुरिया सिप्पस' असे असून त्याचा समावेश लायसिनिडी किंवा निल कुळात होतो. हे फुलपाखरू भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची दोन अंतर्गत संरक्षित आहे.

आढळ व व्यवहार :-

बर्‍याच फुलांवर वावर असतो, त्याशिवाय पंख उघडून ऊन शेकताना दिसून येतात. नर चिखलपान करतात. बांडगूळ ही परजीवी वनस्पती याची खाद्य वनस्पती आहे.

वर्णन :-

पंखविस्तार 3-4.5 सेमी असूू शकतो. बंद पंखांचा रंग पांढरा-करडा असून त्यावर काळ्या खुणांच्या रांगा असतात. मागच्या पंखांच्या टोकाजवळ दोन केसरी-काळे ठिपके व त्यांना लागूनच दोन तारेसारख्या शेपट्या असतात. या खुणा व शेपट्यांमुळे शिकारी नेमके डोके ओळखण्यात गोंधळतो आणि त्यामुळे संरक्षण होते. उघड्या पंखांच्या वरच्या कडा जाड काळ्या असून, नरामध्ये मधला भाग लखलखीत निळसर-मोरपंखी तर मादीमध्ये ठिपकेदार फिकट निळा असतो.

खाद्य वनस्पती :-

बांडगूळ (बांदा) - Honey Suckle Mistletoe
 Dendrophthoe falcata (Loranthaceae)
बांडगूळ ही मोठ्या वृक्षांवर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. ही वनस्पती इतर झाडांना त्रासदायक असल्याने सुरवंटांमार्फत जैवनियंत्रण हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

जीवनक्रम :-

अंडी पांढर्‍या रंगाची असून खाद्य वनस्पतीच्या पानांवर किंंवा खोडावर घातली जातात.
पिकाॅक राॅयल (अंडी)

सुरवंट चार वेळा कात टाकतो, या रुपांना इन्स्टार असे म्हटले जाते. सुरवंट तपकिरी रंगाचा असून त्यावर करडे-पांढरे डाग असतात. त्यामुळे तो पक्ष्यांच्या विष्ठेसारखा दिसतो आणि त्याचे शिकर्‍यांंपासून संरक्षण होते. त्याची लांबी 2 सेमी पर्यंत वाढू शकते. सुरवंट मुंग्यांसोबत सहजीवन जगतो. सुरवंटाकडून मुंग्यांना मधासारखा गोड द्रव दिला जातो बदल्यात मुंग्यांच्या अस्तित्वामुळे सुरवंटाला इतर शिकार्‍यांंचा धोका नसतो.
पिकाॅक राॅयल (सुरवंट)

कोष तपकिरी रंगाचा असतो. मागच्या टोकाने आधाराला चिकटलेला व आधारासलगच असतो.
आठ-दहा दिवसांनंतर कोषातून फुलपाखरू बाहेर येते.


निल - Blues
Lycaenidae > Theclinae > Iolaini